नगर – जिल्ह्यात झालेल्या 178 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकविला आहे. भाजपने 53 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले असून त्याखालोखाल अजित पवार गटाने 36 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 11 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 8 व कॉंग्रेसला 6 ग्रामपंचायतींवर विजय मिळविता आला आहे. राष्ट्रवादीने अजित पवार गट कोपरगाव, शेवगाव, पारनेर, तर भाजपने नगर, श्रीगोंदा, राहाता, पाथर्डी, राहुरी, तर संगमनेर तालुक्यात कॉंग्रेस तसेच अकोले व नेवासे तालुक्यात शिवसेना, पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत ठाकरे गटाने वर्चस्व मिळाले आहे.
जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि.6) रोजी मतमोजणी झाली. यात संगमनेर तालुक्यात 7 पैकी 5 ग्रामपंचायतीमध्ये आ. थोरातांचा झेंडा कायम तर 2 ग्रामपंचायतरमध्ये विखे यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. गुंजाळवाडी,आश्वी बुद्रुकमध्ये थोरात, तर आश्वी खुर्दमध्ये विखे गटाची सत्ता कायम राहिली. घारगावमध्येही विखे गट निवडून येण्यात सक्षम राहिला. थोरात गटाला याठिकाणी पॅनल उभा करणं अवघड राहिले. कोपरगाव तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यात तब्बल 11 ग्रामपंचायतीवर आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचे सरपंच निवडून आले. कोल्हे गटाने 3 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली तर दोन ग्रामपंचायतीवर पाठिंबा देवून सरपंचासह सत्ता मिळवली. मुर्शतपूर व चांदगव्हाण या दोन ग्रामपंचायतीत कोल्हेंची सत्ता आली परंतु सरपंचपद काळे गटाकडे गेल्याने “गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली. तर पोहेगाव ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाच्या मदतीने शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी सरपंचासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली. जवळके येथेही कोल्हे यांनी जवरे यांच्याशी युती करून सत्ता काबीज केली तर कुंभारी येथे माजी सरपंच प्रशांत घुले यांनी काळे-कोल्हे यांचा धुव्वा उडवत सरपंचासह आपली सत्ता अबाधित ठेवली.
श्रीगोंदा तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारल्याने 7 ग्रामपंचायतींमध्ये सत्तापरिवर्तन झाले. कोळगावात माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी माजी सरपंच हेमंत नलगे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. दरम्यान, नऊपैकी आ. पाचपुते गटाकडे तीन तर जगताप-नागवडे गटाकडे प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींची सत्ता गेल्याचे चित्र आहे. कोळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच हेमंत नलगे यांच्या तीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.
अकोले तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 8 ग्रामपंचायत खा.सदाशिवराव लोखंडे याच्या मार्गदर्शनाखाली जिंकुन शिवसेना (शिंदे गट) ने विजयाची घोडदौड केल्याचा दावा जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी केला. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यांनी प्रसिद्धीपत्रक काढून 8 ग्रामपंचायतमध्ये विजयाचा व 14 पोटनिवडणुकीत 5 ग्रामपंचायतमध्ये बहुसंख्य सदस्य विजयी झाल्याचा दावा केला. आ. किरण लहामटे यांचे खंदे समर्थक साहेबराव भांगरे यांच्या विरोधात शिंदे गटाचे बाजीराव दराडे याचा खंदे समर्थक सचिन भांगरे यांचा पॅनल बहुमताने विजयी झाला. तर तालुक्याचे लक्ष लागून असलेला पिंपळदरावाडी डॉ.लहामटे गटाचा पराभव झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायतीवर भाजप, 2 राष्ट्रवादी तर 1उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. नगर तालुक्यात 6 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये वडगाव गुप्ता व देऊळगाव सिद्धी येथील सत्ताधार्यांना सस्ता राखण्यात यश आले. तर अरणगाव, हिवरे झरे, मेहेकरी, हिंगणगावमध्ये सत्ता परिवर्तन झाले. यातील 3 ग्रामपंचायतीवर माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले गटाने सत्ता मिळविली. तर अरणगाव (आ. लंके गट) व हिवरे झरे या दोन ग्रामपंचायतींवर नगर तालुका महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.
राहुरी तालुक्यात भाजपने 11 ग्रामपंचायतींचे सरपंच पद मिळवले. तर राष्ट्रवादी कॉंग्रसकडे 5 तर स्थानिक विकास आघाडी कडे 5 सरपंचपदे आली. तर राहाता तालुक्यात 12 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आपला विजयाचा झेंडा फडकवला. शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व मिळविले आहे. 27 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने 13 ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक सदस्यपदाच्या जागा पटकावल्या. तसेच खरडगाव मध्ये जनशक्ती आघाडीने मुसंडी मारुन राष्ट्रवादीच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली. पारनेर मध्ये सात ग्रामपंचायतची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. आमदार निलेश लंके गटाच्या सहा ग्रामपंचायती वर वर्चस्व तर एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात गेली आहे.
तालुकानिहाय पक्षाचे वर्चस्व
अकोले -21 ग्रामपंचायती पैकी 8 शिवसेना गट, संगमनेर – 7 ग्रामपंचायती पैकी 5 कॉंग्रेस तर 2 भाजप, कोपरगाव-17 ग्रामपंचायती पैकी 11 राष्ट्रवादीकडे तर 3 भाजपकडे, श्रीरामपूर -13 ग्रामपंचायती 8 पैकी, राहाता- 12 ग्रामपंचायती पैकी 9 भाजपकडे, राहुरी- 21 ग्रामपंचायती पैकी 11 भाजप, राष्ट्रवादी 5, तर स्थानिक विकास आघाडी कडे 5, नेवासे -16 ग्रामपंचायती पैकी 12 शिवसेना, नगर -6 ग्रामपंचायती पैकी 3 भाजप दोन लंके गट, पारनेर – 7 ग्रामपंचायती पैकी 6 राष्ट्रवादी गट, पाथर्डी – 14 ग्रामपंचायती पैकी 11 भाजप, 2 राष्ट्रवादी तर 1 उद्धव ठाकरे शिवसेना गट, शेवगाव – 27 ग्रामपंचायती पैकी 13 राष्ट्रवादीकडे, कर्जत- 6 ग्रामपंचायती पैकी 2 भाजप तर 2 राष्ट्रवादी (शरद पवार गट), 1 अपक्ष, जामखेड- 3 ग्रामपंचायती पैकी 2 राष्ट्रवादी, श्रीगोंदे – 9 ग्रामपंचायती पैकी 3 भाजप तर 4 राष्ट्रवादी