पिंपरी (प्रतिनिधी) – थकीत वाहन कर वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेली वाहने वाहन मालकांनी सोडवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही वाहने मुदतीत सोडवून न घेतल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनांचा ई लिलाव केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी, मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन कार्यालयाकडे संपर्क केला नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन मालकांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र नोटीसा वाहन मालकांना पोच झाल्या नाहीत.
संबंधित वाहन मालकांनी पुढील सात दिवसात मोटार वाहन कर, दंड भरून वाहने सोडवून न्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. वाहने सोडवून न नेल्यास त्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.