पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपीची बसस्थानके अथवा बसथांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम आहे. परंतु, रिक्षाचालक या नियमांना पायदळी तुडवत पीएमपी बस स्थानक व थांब्याच्या समोरच रिक्षा उभी करुन व्यवसाय करतात. मागील ३ महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अशा १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पीएमपीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास पीएमपीच्या मुख्य बसस्थानकांच्या परिसरात येवून बसप्रवाशांची वाहतूक करतात. तसेच बसचालकांना अडथळा होईल, अशा प्रकारे रिक्षा लावत असल्याबाबतच्या तक्रारी परिवहन महामंडळाचे चालक, प्रवाशी व प्रवाशी मंचाकडून वारंवार प्राप्त झाल्या आहेत.
त्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशान्वये परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे.
या पथकासमवेत प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आरटीओ) वरिष्ठ अधिकारी देखील असतात. परिवहन महामंडळाकडील ४ सेवक व १ आरटीओ अधिकारी यांचे पुणे शहरासाठी १ व पिंपरी-चिंचवड शहरासाठी १ अशी दोन संयुक्त दक्षता पथके तयार करण्यात आलेली असून मागील ३ महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीच्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येवून नियम मोडणाऱ्या एकूण १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
महिना दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षांची संख्या
जानेवारी ५५३
फेब्रुवारी ६२२
२६ मार्च ४४५
एकूण १६२०
अपघाताची शक्यता
पीएमपी बसस्थानकांच्या परिसरात रिक्षा व इतर खासगी वाहने दिसल्यास वाहनांवर आरटीओ पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. अपघाताची शक्यता असल्याने रिक्षा व इतर खासगी वाहनांनी बस
स्थानकांचे परिसरात त्यांची वाहने उभी करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.