केंदूर – पिंपळे जगताप येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार केंद्र लॉकडाऊनमुळे बंद ठेवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागल्याने हे उपबाजार केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. दैनिक प्रभातने याबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर संचालक मंडळाने बैठक घेऊन उपबाजार केंद्र सोमवारपासून (दि. 8) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार अशोक पवार यांच्याशी चर्चा करून सभापती शशिकांत दसगुडे यांच्या सूचनेनुसार उपसभापती विश्वास ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून हे मार्केटयार्ड सुरु होणार आहे. यावेळी आडतदारांच्या समस्या संचालक मंडळाने जाणून घेतल्या. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी वेळात बदल केला आहे दुपारी एक ते चार या वेळात तरकारीची विक्री तर सायंकाळी पाच ते आठपर्यंत भाजीपाला विक्रीसाठी मार्केट खुले राहणार आहे.
दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी यापुढे कच्चा कागदावर पट्टी लिहून न देता कायदेशीर पट्टी देण्याची सूचना संचालकांनी आडतदारांना केली. संचालक शंकर जांभळकर यांनी मार्केट यार्ड सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
यावेळी मार्केटयार्डचा परिसर रोज फवारणी करून निर्जंतुकीकरण करणार असल्याचे विभागप्रमुख अनिल ढमढेरे यांनी सांगितले. यावेळी संचालक विकास शिवले, प्रवीण चोरडिया, सुधीर गुंदेचा, सचिव अनिल ढोकले, अडतदार संघटनेचे अध्यक्ष गणेश गावडे, नरसिह ढोकले, धनंजय भुजबळ, निलेश धुमाळ उपस्थित होते.-