मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद असलेले देशातील शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळं, हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. मात्र केवळ नॉन कंटेन्मेंट झोनमधीलच मॉल, धार्मिक स्थळं आणि हॉटेल सुरु केले जाणार आहेत. नव्या नियमांनुसार प्रवेशासाठी टोकन यंत्रणेसारख्या व्यवस्था असणार आहेत. तर मंदिरांमध्ये प्रसाद दिला जाणार नाही. देशात 1 जूनपासून अनलॉक 1.0 सुरु झाला आहे, तर कन्मेंन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे.
अनलॉक 1.0 च्या या टप्प्यात धार्मिक स्थळं आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल सुरु करता येणार आहे. परंतु प्रत्येक राज्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानुसार नियम जारी केले आहेत. नुकतंच महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये बरीचशी सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात नवी सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम म्हणत ‘मिशन बिगिन अगेन’ हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्यात मिशन बिगिन अगेनच्या फेर 3 ला आजपासून सुरुवात होणार आहे. 10 टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालये सुरु होणार आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी मुंबईत बेस्ट सुविधा सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत. परंतु राज्यात धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्यास अद्याप परवानगी नाही.