फलटण-लोणंद रेल्वे सेवा आजपासून सुरू

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर ः फलटणकरांचे स्वप्न पूर्ण

फलटण – लोणंद-बारामती या नव्याने सुरू होत असलेल्या रेल्वे मार्गावरील लोणंद-फलटण मार्गावर उद्या, दि. 11 पासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे. त्याचे उद्‌घाटन माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे. अशी माहिती सोलापूर विभाग रेल्वे मंडळाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर व माझ्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

फलटणला रेल्वे सुरू व्हावी यासाठी हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी 1996 पासून लढा उभारला होता. ते खासदार असताना संसदेत आवाज उठवला होता; परंतु नंतर सरकार बदलल्याने फलटणच्या रेल्वेकडे दुर्लक्ष केले गेले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तातडीने रेल्वे सुरू करण्याचा शब्द मी दिला होता. तो मी पाळला आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे लोणंद-फलटण दरम्यान डिझेलवर चालणारी रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून मध्य रेल्वेच्या मुंबईतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे बुधवापासून फलटण-लोणंद रेल्वे सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने फलटण-पुणे, फलटण-कोल्हापूर रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम लवकर सुरू होणार आहे.

त्यासाठी केंद्राकडून निधीची तरतूद करण्यात येत असून राज्य सरकारकडूनही निधी मिळवायचा प्रयत्न सुरू आहे. रेल्वे सेवेच्या उद्‌घाटनासाठी फलटण, बारामती, खंडाळा, माळशिरस तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी, नेते, रेल्वे अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोणंदवरून फलटणकडे दिवसभरात रेल्वेच्या दोन फेऱ्या होणार असून रविवार सोडून इतर दिवशी रेल्वेगाड्या या मार्गावर धावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.