कराची – इराणमधून पाकिस्तानमध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणच्या सीमेजवळील तफतन शहरातून पाकिस्तानमध्ये फॉस्फरस आणि अन्य रसायनांची वाहतूक करत असताना ही रेल्वे रुळावरून घसरली आहे.
शनिवारी तफतन शहरापासून ७० किलोमीटर अंतरावर बलुचिस्तानमधील तोझगी स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेमागे दहशतवाद्यांकडून घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पाकिस्तान रेल्वेचे प्रवक्ते आमिर बलोच यांनी सांगितले.
ही मालगाडी रुळावरून घसरल्याने लोकोमोटिव्हचे, कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीचे डबे आणि मालवाहू काही वॅगन्सचे मोठे नुकसान झाले.
एकच दिवस आगोदर बलुच दहशतवाद्यांनी बलुचिस्तानमधील नोशकी महामार्गावर केलेल्या हल्ल्यामध्ये पंजाब प्रांतातील ९ मजूरांचे अपहरण केले होते.
या मजूरांना डोंगरात नेऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. या मजूरांकडील ओळखपत्रांच्या आधारे त्यांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख पटवण्यात आली होती. अन्य एका वाहनावर झालेल्या गोळीबारात दोघेजण ठार झाले होते.
बलुच दहशतवाद्यांनी नोशकी येथील रेल्वेमार्गाचे नुकसान देखील केले होते. त्यानंतर या भागात नाकाबंदी करण्यात आल्यामुळे अजूनही या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाऊ शकलेले नाही.