सर्व कार्येशु सर्वदा : बाप्पांना निरोपाची तयारी पूर्ण

पुणे – लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नदीकाठच्या प्रमुख घाटांसह, शहरात 83 विसर्जन हौदांवर स्वच्छता, सुरक्षा तसेच इतर अत्यावश्‍यक सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा खडा पहारा ठेवण्यात येणार आहे. सोबतच सीसीटीव्हींची नजरही येथे असेल. तर गणेशभक्तांना आरतीसाठी सुविधा, स्तनदा मातांसाठी यंदाही “हिरकणी कक्ष’, निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.

130 जीव रक्षकांची फौज
विसर्जनासाठी येणारे भाविक आणि गर्दीची शक्‍यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून 18 विसर्जन घाटांवर प्रत्येकी 2 प्रशिक्षित जीव रक्षकांसह 1 फायरमन आणि इतरत्र तब्बल 130 जीव रक्षक तैनात केले आहेत. नदीपात्रात तीन ठिकाणी आडवे दोर टाकण्यात आले आहेत. प्रमुख पुलांवर “नेकलेस’ आकाराचे दोर बांधण्यात आले आहेत. दोन ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश यंत्रणा उभारण्यात येणार असून मुख्य मिरवणूक असलेल्या अलका टॉकिज चौकात अग्निशमन दल वाहनासह, ऍम्ब्युलन्स आणि अग्निशमन बुलेटही तैनात राहणार असल्याचे दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी स्पष्ट केले. तर सर्व विसर्जन घाटांवर तब्बल 650 सीसीटीव्हीही पालिकेने बसविले आहेत.

डॉक्‍टरांची कुमक
विसर्जन कालावधीत महापालिका रुग्णालयांमध्ये अतिरिक्त डॉक्‍टर असतील.तर, खासगी स्वयंसेवी संस्था तसेच “आयएमए’च्या माध्यमातून डॉक्‍टर तसेच ऍम्ब्युलन्सची सुविधाअसेल. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सीसीटीव्हींचे मॉनिटरिंग करण्यासह, पोलीस आणि पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी दिली.

हे आहेत प्रमुख विसर्जन घाट
संगम घाट, वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाट, अष्टभुजा मंदिर घाट, बापू घाट, विठ्ठलल मंदिर (अलका चौक), ठोसरपागा घाट, राजारामपूल घाट, चिमा उद्यान, येरवडा, वारजे-कर्वेनगर (गल्ली क्रमांक-1 नदी किनारी), नेने घाट, ओंकारेश्‍वर, पुलाची वाडी, खंडोजी बाबा चौक, गरवारे महाविद्यलय घाट, दत्तवाडी घाट, औंध गाव घाट, बंडगार्डन घाट, पांचाळेश्‍वर घाट.

साडेचार हजार स्वच्छता कर्मचारी
विसर्जन मार्ग व हौदांच्या ठिकाणी तब्बल साडेचार हजार स्वच्छता कर्मचारी असतील. दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करतील. काही स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होतील. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, गर्दीच्या ठिकाणी तसेच मिरवणूक व विसर्जन मार्गांवर मोबाइल टॉयलेटही उपलब्ध असतील. नदीपात्रात वाहून आलेला कचरा स्वच्छ करून प्रमुख 18 विसर्जन घाटांवरही स्वच्छता केली जाणार आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.

आपत्कालिन मदतीसाठी संपर्क
101- अग्निशमन दल
100- पोलीस
आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 020- 25501269, 25506800/1/2/3 –
ऍम्ब्युलन्स – 108

Leave A Reply

Your email address will not be published.