पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विद्यापीठाच्या एका पीएच. डी. मार्गदर्शक प्राध्यापिकेला विद्यार्थ्याकडून लाच घेताना पकडण्यात आले होते. विद्यापीठाच्या वतीनेही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून, त्यांची मार्गदर्शक म्हणून असलेली मान्यता काढण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील प्राध्यापिका यांना विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, ही कारवाई फक्त हिमनगाचे टोक आहे, अशा प्रतिक्रियाही अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.
पुणे विद्यापीठाने तात्काळ या मार्गदर्शकावर कारवाई करावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी कडक धोरण राबवावे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. विद्यापीठाच्या वतीने या घटनेचा अभ्यास करण्यात येत असून, मार्गदर्शकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
त्यांची तातडीने मार्गदर्शक म्हणून मान्यता काढून घेण्यासह त्यांच्या पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना दुसरा मार्गदर्शक देण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत होणाऱ्या कारवाईचे स्वरूप विद्यापीठाच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.