पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुंपणावर असलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर आता ‘साहेब’ की ‘दादा’ अशी निवड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याआधी दादा आणि ताई दोघांकडे ये- जा करणारे आणि पक्षफुटीनंतर आजपर्यंत तटस्थ राहणारे चांगलेच कात्रीत सापडल्याचे दिसत आहे.आता प्रचाराच्या रिंगणात कोण कोणासोबत असणार, हे चित्र स्पष्ट होईल.
खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे वर्चस्व आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत एकीचे बळ कमी पडते आणि हातात आलेला मतदारसंघ किरकोळ मतांनी राष्ट्रावादीच्या हातातून निघून जातो. अशी परिस्थिती दोन वेळा झाली.
आता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच फूट पडली आणि शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहे. काही पदाधिकारी व कार्यकर्ते दादा गटात गेले, तर काही साहेबांच्या गटात. मात्र, आजही काही पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेसाठी इच्छुक असलेले उमेदवार दोन्ही पवारांकडे उपस्थिती लावताना दिसत आहेत, तर काही जण तटस्थच्या भूमिकेत आहेत.
खडवासला विधानसभा मतदासंघ हा बारामती लोकसभेत अंतर्भूत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत इच्छुकांच्या यादीत प्रबळ व्हायचे म्हटल्यावर ताई आणि साहेबांच्या गटात जाणे योग्य. दादांची गॅरंटी नाही, या विचाराने काही शरद पवार गटात सहभागी झाले. तर दुसऱ्या बाजूला दादा सत्तेमध्ये आहेत, पुण्याचे पालकमंत्री आणि महापालिका निवडणुकीबरोबरच पक्षात महत्त्वाचे पद मिळू शकते, कामे होऊ शकतात, या आशेने काही आमदार, पदाधिकारी अजित पवार गटात गेले.
मात्र, यातील काही पदाधिकारी हे आजही खडकावासला मतदारसंघात अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा शरद पवार या सर्वांच्या बैठकीला उपस्थित असतात.तर काही उमेदवार प्रभागात असूनही फोन बंद, आजारी असणे किंवा बाहेरगावी आहे, असे सांगून तटस्थ राहात आहेत.
डबल ढोलकी बंद
फोन आल्यावर दादा तुमच्याबरोबर, ताई तुमच्याबरोबर, असे सांगितले जाते. मात्र, आता ही डबल ढोलकी लवकरच बंद होणार आहे. कारण बारामती लोकसभेतील दोन्ही उमेदवार हे पवार कुटुंबीयातील आहे. तेच उमेदवार एकाच कुटुंबातील नसते, तर ताई आणि दादांना त्या उमेदवाराबरोबर आपले पटत नाही किंवा अन्य काही कारणे देऊन वेळ मारून नेता आली असती.
मात्र, आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे दोन उमेदवार असल्याने पदाधिकारी कात्रीत सापडले आहेत. त्यांना आता साहेब की दादा, हे ठरवावेच लागणार आहे; अन्यथा त्याचा परिणाम आगामी निवडणुका आणि पक्षातील स्थान टिकविण्यावर होऊ शकतो.