लोकांचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. कलाम

तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात. या शब्दांत ज्यांनी देशातील तरूणाईला प्रेरणा दिली, जगण्याचे बळ दिले असे मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळख निर्माण करणारे डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम हे समस्त भारतीयांसाठी आदर्श आहेत. त्यांचा जन्म 15 ऑक्‍टोबर 1931 रोजी रामेश्‍वरम्‌ येथे झाला. त्यांचे वडील रामेश्‍वरम्‌ येथे बोट चालवायचे. घरची परिस्थिती साधारण असल्याकारणाने कलाम यांना शिकत काम करणे क्रमप्राप्त होते. वर्तमानपत्र विकण्याचे काम त्यांनी केले.

शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत, तंत्रज्ञ, राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्‍टोबरला संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. इस्रो आणि डीआरडीओ या दोन्ही संस्थांमध्ये काम करीत असताना त्यांनी सांघिक कामगिरीवर विशेष भर दिला.अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये तसेच पोखरण येथील अणुचाचणीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

विद्यार्थ्यांमध्ये राहणे, त्यांना शिकविणे हे त्यांचे आवडीचे विषय. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग येथे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचे निधन झाले. कलाम यांनी देशासाठी दिलेल्या अत्त्युच्च योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

हवाई दलामधे जाण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले मात्र, अंतिम यादीमध्ये त्यांची निवड झाली नाही. मात्र,ते अपयश मनावर न घेता ते लढत राहिले आणि एक दिवस राष्ट्रपती म्हणून तिन्ही दलांचे प्रमुख झाले.अग्निपंख हे कलाम यांचे आत्मचरित्र सर्वांनी वाचायला हवे, असेच आहे. त्यामध्ये जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून संघर्ष करीत माणूस यशस्वी होऊ शकतो, हे समजते. आपल्या व्यस्त दिनचर्येतूनही वेळ काढून त्यांनी असंख्य दर्जेदार पुस्तके लिहिली.

राष्ट्रपती म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती म्हणून प्रवेश करताना आणि कार्यकाळ संपल्यानंतर तेथून बाहेर पडताना केवळ काही कपडे आणि पुस्तके घेऊन त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे आदर्श असे उदाहरण आहेत. असा राष्ट्रपती पुन्हा होणे नाही.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)