पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या सायन्स पार्कला माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिसाईल मॅन अशी ओळख असलेल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे या देशातील वैज्ञानिक क्षेत्रातील विशेष योगदान आहे. त्यांचे हे कार्य देशातील तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असुन वैज्ञानिक क्षेत्रात देशासाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ते एक प्रेरणा स्त्रोत आहेत.
त्यांचे भारतीय अवकाश संशोधन संघटनेमधील व संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मधील काम हे आधुनिक भारताच्या शक्तीचे व गुणवत्तेचे प्रतीक आहे. त्यांच्या विशेष कार्याच्या जोरावर भारताने अवकाश संशोधन संरक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचा प्रमुख या पदावरून काम करीत असताना त्यांनी क्षेपणास्त्र विकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे.
क्षेपणास्त्र प्रक्षेपण वाहन विकासात देखील त्यांचा भरीव वाटा असून त्यांनी पंतप्रधानांचे व संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम केले. पोखरण अणु परीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यात देखील त्यांची प्रमुख भूमिका होती. या सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक क्षेत्रातील चिकित्सक वृत्ती वाढावी, त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोणाला चालना मिळावी, याकरिता सायन्स पार्कला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देत, प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाची कमान उभारण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.