जखमीवर उपचार सुरू : लोणावळ्यातील वेहेरगाव येथील प्रकार
लोणावळा – वेहेरगाव (ता. मावळ) येथे दोन मित्रांमध्ये झालेल्या वादावादीतून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर पिस्तुलातून गोळीबार केला. सोमवारी (दि. 22) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर (रा. कान्हे, ता. मावळ) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर गोळी लागली आहे. या प्रकरणी दिनेश शिंदे (रा. कामशेत, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षद बाळासाहेब वाघमारे (वय 21, रा. मुंढावरे, मावळ) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद वाघमारे, जखमी मंथन सातकर, समीर सुरेश सिरसाट (रा. नांगरगाव, ता. मावळ) आणि आरोपी दिनेश शिंदे हे चौघे मित्र आहेत. ते नेहमीच एकमेकांना भेटत असत. सोमवारी (दि. 22) सायंकाळी सहा वाजता मंथन सातकर याचा मामा चंद्रकांत देवकर हे देखरेख करीत असलेल्या “आई कुंकाई’ या बंगल्यावर आराम करण्यासाठी गेले होते. रात्री नऊ वाजता जेवण झाल्यावर हे सर्वजण बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर एकत्र बसले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक मंथन सातकर आणि आरोपी दिनेश शिंदे यांच्यात वाद झाला. या वादातून दिनेश याने पिस्तूलामधून मंथन याच्यावर गोळीबार केला.