मुंबई – भारतीय चलनी नोटांवर आता रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो दिसतील, अशा बातम्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. याबाबत माहिती देताना रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, असा कोणताही प्रस्ताव विचारधीन नाही.
अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक नवीन मालिकेच्या नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या चित्रासह नोटा छापण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रसिद्ध करण्यात आल्या. यावरूनच आरबीआयने ट्वीट करून एक प्रेस रिलीज जारी केली असून त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
माध्यमांमधील एका गटाने असे वृत्त दिले होत की, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या आरबीआय, सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीआयएल) यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे दोन वेगवेगळे वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीला पाठवले आहेत.
एका रिपोर्टनुसार, 2020 मध्ये आरबीआयच्या अंतर्गत समितीने महात्मा गांधींव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांच्या चेहऱ्यासह नोट छापण्याची शिफारस केली होती.