पुसेगाव – कितीही खोटी नाटक केली आणि कोणीही कुठे गेला तरी जनता यावेळी नक्की बदल करेल, असा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त कला. चिंचणेर निंब गावचे उपसरपंच दत्तात्रय भीमराव किर्दत यांचा विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी आपल्या गटात प्रवेश केल्याचा गैरसमज पसरविला. याबाबत उपसरपंच किर्दत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेत स्पष्टीकरण दिले. सैनिकांच्या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी विद्यमान आमदार महेश शिंदे यांना ते भेटायला गेले होते. महेश शिंदे यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला अशी खोटी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्या.
याबाबत श्री. दत्तात्रय किर्दत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेत परिस्थिती सांगितली. फोटो काढून आमदार शशिकांत शिंदे यांना कंटाळून प्रवेश केल्याचे बदनामीकारक षडयंत्र महेश शिंदे यांनी केले. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आ. शशिकांत शिंदे यांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे किर्दत यांनी स्पष्ट केले.
प्रेमाने आणि हिताने गेलेला माणूस हा त्याच्या वैयक्तिक मर्जीने जात असतो. परंतु, दुर्दैवाने एखाद्या कामासाठी आलेल्या माणसाचा प्रवेश घेतला आणि तसं दाखविण्याचा प्रयत्न सध्या विद्यमान आमदारांकडून सुरू आहे. जे पूर्वीपासून आमच्याकडे नाही त्यांचा सुद्धा प्रवेश करून घेतला, अशा प्रकारचे चित्र हल्ली सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राद्वारे आम्ही पाहतो, असे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
आमदार म्हणून निवडून आल्यापासून १९९९ पासून चिंचनेर (निंब) गाव माझ्याशी एकनिष्ठ आहे. त्यातील प्रतिनिधीचा प्रवेश झाल्याचे चित्र दाखवणे दुर्दैवी आहे. माणसे प्रेमाने जिंकायची असतात ती जबरदस्तीने जिंकता येत नसतात. येणारा काळ याचे उत्तर नक्कीच देईल. माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. त्यांनी माझी भेट घेत प्रवेश न केल्याचे सांगितले आणि गैरसमज पसरविला असल्याचे स्पष्ट केले, असे शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.