उस्मानाबाद – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गटासह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताहेत. त्यासोबतच अंधारे यांनी मागील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र अंधारे यांची धाराशिव येथे होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी मागावी नाहीतर त्यांची सभा उधळून लावू असा इशारा मनसे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी दिला आहे. याबाबतची त्यांची फेसबुक पोस्ट देखील चांगलीच व्हायरल होत आहे. उद्या सायंकाळी अंधारे यांची उस्मानाबाद येथे सभा आहे.
“आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो”. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मुलुंडमधील सभेतून राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. आज त्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. उद्या त्यांची सायंकाळी ६ वाजता सभा देखील पार पडणार आहे. त्यावरूनच आता स्थानिक मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे आता मनसे नेत्यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे अवघ्या माहाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.