पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे विभागात 288 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी 133 गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) झाले आहे. तर, 175 संस्थांचे अभिहस्तांतरण झालेले नाही, अशी कबुली राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना सहकारमंत्री वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात बांधकाम व्यावसायिकांनी इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर सोसायटीकडे अभिहस्तांतरण करणे आवश्यक असतानाही अनेक गृहनिर्माण संस्थांचे अद्यापही मानीव अभिहस्तांतरण करण्यात आलेले नाही. यामुळे अनेक सासायट्यातील सदस्यांचे अनेक व्यवहार खोळंबले. त्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे राज्य तसेच पुणे शहरातील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास तसेच डीम्ड कन्व्हेअन्स अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची बाब खरी आहे. अभिहस्तांतरण आदेश, प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसरायची कार्यपद्धती सहकार विभागाच्या 22 जून 2018 आणि 31 मे 2023 शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे.
गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुणे मंडळाकडून शहरातील अभिहस्तांतरण बाकी असलेल्या गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे, असेही सहकार मंत्री यांनी सांगितले.