लोणावळा- मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी रात्री आडोशी गावच्या हद्दीत दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरडीचा रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला केल्यावर सुमारे साडे चार तासाच्या खोळंब्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
रायगड जिल्ह्यातील आडोशी गावचे हद्दीत किमी 41 जवळ मुंबई लेनवर रात्री 10.35 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून दगड व माती एक्सप्रेस हायवेच्या मुंबई बाजूच्या तीनही लेनवर आल्याने मुंबई लेनवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी किंवा नुकसान झाले नाही. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील सर्व माती व राडारोडा बाजुला केल्यानंतर या तीनही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. मात्र, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक पवर्ववत होण्याकरिता साडे चार तास वाट पहावी लागली.
लोणावळा व रायगड जिल्ह्यातील बोर घाट परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे डोंगर भागात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडत आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने अलर्ट जारी केला असून बचाव पथक आणि यंत्रणा सज्ज आहेत. एक्स्प्रेसवेला दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने आयआरबी आणि बोर घाट क्षेत्रात बचावाचे काम करणारी “अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ ही संघटना घाट क्षेत्रात लक्ष ठेऊन आहे. रविवारी रात्री दरड कोसळल्याची माहिती कळताच आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तर “अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भर पावसात आयआरबीचे जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने युद्ध पातळीवर ही दरड हाटवली.
सोमवारी दुपारी मुंबई लेन दोन तास बंद
मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी रात्री आडोशी गावाच्या हद्दीत कोसळलेली दरड मध्यरात्री उशिरा बाजुला करीत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र उपाययोजना म्हणून दरड पडलेल्या भागातील इतर सुटे झालेले दगड व माती काढण्याच्या कामासाठी सोमवारी दुपारी 12 ते 2 दरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ची मुंबई लेन बंद ठेवण्यात आली होती.