पुणे – महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ चे पुणे महापालिकेच्या प्रभाग दोनमध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी ४०० थकीत मुद्रांक शुल्क म्हाडाची प्रकरणे मार्गी लावली. त्यामुळे अभिहस्तांतरणाचा मार्ग मोकळा होऊन येथील म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील अडथळे आणखी कमी झाले आहेत.
म्हाडाचे प्रवीण वाघमारे, गोडे, अॅड. सराफ, अॅड. प्रदीप पाटील, मुद्रांक शुल्क विभागाचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, संतोष हिंगणे आदींसह ३२ जणांची समिती या उपक्रमासाठी सहभागी झाले होते. या बरोबरच प्रभागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समितीचे अजय बल्लाळ, संयुक्त संघाचे डी. के. जाधव, नामदेव वेताळ, समतानगर गाळेधारक महासंघाचे सचिव शिवाजीराव ठोंबरे, हिंदु संस्कृतीचे दिलीप महस्के, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ, त्रिरत्न संघ, पथारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग दोनमधील म्हाडाच्या इमारत पुनर्विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इमारतीचे अभिहस्तांतरण करणे हा म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक गाळेधारकांनी थकीत मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दि. १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आलेली आहे. ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.