मंचर, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आंबेगाव तालुक्यात आले असता त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह (लंच) दुपारचे भोजन एकत्र करत जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी (दि. 4) शिरूर, आंबेगाव तालुक्याच्या दौर्यावर आले होते. शिरूर तालुक्यातील मांडवगाव फराटा येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेलिकॉप्टरद्वारे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय येथे आले असता त्यांचे स्वागत सहकार मंत्री दिलीपराव वळचे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी कोल्हापूर विशेष महापरीक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी, जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन पाटील, मंचरचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी येत भोजनाचा अस्वाद घेतला.
माजी खासदार शिवाजीराव पाटील हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होते. तसेच त्यांचे सहकारमंत्री वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक देवेंद्र शहा यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याने त्यांच्यात बराच वेळ गप्पा सुरू होत्या. यावेळी पूर्वा वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उद्योजक सतीश बेंडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.