पुणे – महापालिका आयुक्तांकडून 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचे कामकाम सुरू केले असून या अंदाजपत्रकात पुणेकरांनाही आपल्या प्रभागातील विकासकामे सुचविता येणार आहे. तीन सदस्यांच्या एका प्रभागासाठी 75 लाखांपर्यंतचा निधी दिला जाणार असून प्रत्येक एका नागरिकाला जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंतचा निधी दिला जाणार आहे.
महापालिकेकडून 2006-07 पासून नागरिकांचा अंदाजपत्रकात सहभाग हा उपक्रम राबविला जात आहे. दरम्यान, नागरिकांना 31 ऑगस्ट पर्यंत या अंदाजपत्रकासाठी कामे सुचविता येणार आहेत. शहरात अनेक भागात अनेकदा नागरिकांना महापालिकेस कामे सुचवायची असतात, त्यात, अनेक छोट्या कामांचा समावेश असतो, नागरिकांना प्रभागात ही कामे महत्त्वाची असतात, तसेच या निमित्ताने अंदाजपत्रकात नागरिकांचाही सहभाग असावा या उद्देशाने जनवाणी संस्थेच्या पुढाकाराने महापालिकेने अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग हा उपक्रम सुरू केला आहे.
अशी असणार तरतूद
आयुक्तांच्या आदेशानुसार, प्रभागामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असल्यास त्या प्रभागास कमाल रक्कम रुपये 75 लाख तसेच 2 सदस्यांचा प्रभाग असल्यास कमाल रक्कम रुपये 50 लाखाची मर्यादा ठेवावी. तसेच एका कामाची रक्कम रुपये 5 लाखापेक्षा जास्त नसावी. नागरिकांकडून आलेले प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयांकडे जाणार असून सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून ही माहिती महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकासाठी पाठविली जाईल. त्यानुसार, नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश अंदाजपत्रकात केला जाईल.