हिंजवडी, माण, मारुंजीसह परिसरात शांततेत मतदान

चोख बंदोबस्त : पोलीस आयुक्तांनी दिली मतदान केंद्रांना भेट

हिंजवडी – सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई येथील प्रमुख ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रांवर कुठला ही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.

मागील ग्रामपंचायत निवडणुकीचा इतिहास पाहिला तर हिंजवडी आणि माण हे गावे अतिसंवेदनशील घोषित केली जात होती. त्यामुळे या वेळेस निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी चिखली, सांगवी व वाकडचे मनुष्यबळ बोलवून चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हिंजवडी, माण परिसरात मतदान केंद्रांवर भेटी दिल्या.

स्थानिक पोलीस प्रशासन यांच्यासह स्वतः प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार व सहायक आयुक्त गणेश बिरादार यांनी देखील ठिकठिकाणी भेटी देत आढावा घेतला. त्यामुळे एकंदरीत येथील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

महिला, तरुण मतदारांत मोठा उत्साह
सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. महिला आणि तरुण मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. अनेक ठिकाणी भर उन्हात मतदार रांगेत उभे होते. जांबे आणि माण परिसरात बोगस मतदान होत असल्याची चर्चा देखील पाहायला मिळाली. या वेळी मतदान शांततेत पार पडले. या वेळी निवडणुकीत रंगत पाहायला मिळाली.

पोलीस प्रशासनाने मानले नागरिकांचे आभार
ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी मतदान संपल्यानंतर साडेपाच वाजता सर्व मतदार, उमेदवार, पुढारी आणि कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले. पुढेही सरपंच पदाच्या निवडीत असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्या वेळी उपस्थितांनी देखील टाळ्या वाजवून पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक केले.

मतदानासाठी रांगा
दुपारी 3 पर्यंत मतदान केंद्रांवर रांगाच रांगा पाहायला मिळत होत्या. यंदा पहिल्यांदा आयटीतील मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला होता. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांसह महापालिकेमधील नेते, नगरसेवक या परिसरात तळ ठोकून होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.