पुण्यात ‘या’ बँकेवर ईडीची छापेमारी; कागदपत्रांची झाडाझडती सुरू

ED raids Shivajirao Bhosale Sahakari Bank

पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. हे पथक शुक्रवारी सकाळीच शहरात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यापैकी आमदार भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव यांना पोलिसांनी फेब्रुवारीत अटक झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

 

 

भोसले यांच्या लॅंड क्रूझर, टोयोटा कॅमरी अशा दोन आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या 32 कोटी रुपयांच्या मालमत्ता अधिगृहित करण्याचा प्रस्तावही सरकारकडे पाठवला आहे. या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

 

मालमत्तेची किंमत 32 कोटी

भोसले यांच्याकडे कोरेगाव मूळ येथे स्वतःची शेती, तसेच शिवाजीनगर, विश्रांतवाडी, कोथरूड, वारजे यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात दुकाने, व्यावसायिक संकुल, दुकाने, सदनिका, मिळकती अशा 18 हून अधिक मालमत्ता आहेत. त्याचबरोबर त्यांची 170 बॅंक खाती असून त्यामध्ये एक कोटी 90 लाख रुपयांची रोकड आहे. संपूर्ण मालमत्तेची किंमत 32 कोटी रुपये इतकी असून ही मालमत्ता अधिगृहित करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे.

 

 

निर्बंधांनंतरही काढले सव्वादोन कोटी रु. 

बॅंकेवर निर्बंध घातल्यानंतरही या प्रकरणातील आरोपींनी बॅंकेतून एकूण दोन कोटी 14 लाख रुपये काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. अनिल भोसले आणि जाधव यांच्या सांगण्यावरून पडवळ व शैलेश भोसले यांनी गैरव्यवहाराची रक्कम बॅंकेतून काढली. अमर जाधव यांचे 80 कोटी रुपयांचे चेक डिस्काउंटिंगकरता 3 कोटी 25 लाख रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.