मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीत धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकांनी दिलेला जनतेचा कौल मान्य केला आहे. यापुढे लोकांशी संपर्क साधून पक्षाचा जनाधार वाढविण्याची खबरदारी मी आणि कार्यकर्ते घेणार आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूकीच्या निकालादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाचे धक्के बसत असताना शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मतदारांनी दिलेला कौल मान्य केला. या निवडणुकीत आम्ही ज्या जागा गमविल्या त्यापैकी काही जागांवर आमचे उमेदवार काठावर पराभूत झाले. गेल्यावेळी भाजपच्या उमेदवारांनी लाखांच्यावर मताधिक्य घेतले होते. यावेळी त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे, असे ते म्हणाले.
निवडणुकीत 11 ते 12 जागा जिंकू अशी आमची अपेक्षा होती. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील चित्र आमच्यासाठी आशादायी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा