युतीने मुंबईचा गड राखला; कॉंग्रेस, राष्ट्रवादी हद्दपार

शिवसेना 3, भाजपा 3 जागांवर विजयी

मुंबई (प्रतिनिधी) – 17 व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये मुंबईच्या मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना-भाजपाला विजयाचा कौल दिला आहे. देशभरातील जनमताचा कौल प्रतिबिंबित करणाऱ्या मुंबईचा गड राखत शिवसेना-भाजपाने लोकसभेच्या सहाही जागा खिशात घालत 2014 च्या निकालाची पुनरावृत्ती केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीच्या विरोधात रान उठवूनही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानहानीकारक पराभव टाळता आला नाही. त्यांना मुंबईत एकही जागा जिंकता आली नाही. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाच्या अभूतपूर्व यशाबद्दल युतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर आणि लाडूंनी तोंड गोड करत मुंबईत विजयाचा जल्लोष साजरा केला.

मुंबई, ठाण्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातही कॉंग्रेस आघाडीला पराभवाचे धक्के बसले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी काही मतदारसंघात निर्णायक मते घेत महाआघाडीच्या पराभवाला हातभार लावला. मुंबईत कॉंग्रेस आघाडीचे पानिपत झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुतीचा आत्मविश्वास दुणवला आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून प्ररंभ झाला. सुरूवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी हाती घेण्यात आली. मतमोजणीत सुरूवातीपासून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. ही आघाडी पुढे वाढतच गेली.

कॉंग्रेस आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला एकाही फेरीत आघाडी घेता आली नाही. महायुतीच्या उमेदवारांची विजयी आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. उत्ऐतर मुंबईतून कॉंग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उतरविल्ऐयाने चुरस वाढली होती. मुंबईतील ही लढत रंगतदार ठरली होती. मात्र, भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी मातोंडकर यांचा पराभव करीत चौथ्यांदा विजयाला गवसणी घातली. उत्तर पश्‍चिम मतदारसंघात शिवेसेनेने गड कायम राखला आहे.

शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार गजनान किर्तीकर हे दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडूण गेले आहेत. किर्तीकर यांनी कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांना पराभवाची धुळ चारली. तर उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्या पुनम महाजन यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना पुन्हा पराभवाचा दणका देत आपली जागा कायम राखली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड तर दक्षिण मुंबईत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पराभव केला आहे. शिवेसेनेचे हे दोन्ही खासदार दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. मुंबई ईशान्य मतदारसंघात भाजपाचे किरीट सोमय्या यांच्या ऐवजी उमेदवारी दिलेल्या मनोज कोटक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील यांचा पराभव करीत पहिल्यांदाच लोकसभेची पायरी गाठली आहे.

लोकसभा निकालाचा कल महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या नरिमन पॉंईंट येथील कार्यालयात तसेच शिवसेना भवनासमोर युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. फटाक्‍यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, ढोलताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी बेभान होऊन विजय साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात येऊन जल्लोषात भाग घेतला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फडणवीस यांना पेढा भरवून विजय साजरा केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुखा उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.