लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही.
राज यांच्या “लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. तरी याचा परिणाम मतदानावर झालेल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान दिसत नाही. राज यांनी सभा घेतलेल्या सर्व 10 मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचेच उमेदावर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रचार करणारे राज ठाकरे सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होताना दिसत आहेत.
राज यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान 12 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये एकूण 10 सभा घेतल्या. यासभांद्वारे त्यांनी मोदी-शहा जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. राज यांच्या सभांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदावरांना आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले.