आंबेगाव तालुक्यात लवकरच जाहीर सभेचे आयोजन
पारगाव शिंगवे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आंबेगाव तालुक्यात लवकरच जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच येथील नेतृत्वावर (सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील) विषयी आपले परखड मत व्यक्त करणार आहेत, असे बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम बोलत होते. यावेळी विजय निकम संदीप निकम, महेश भोजणे ,भगवान रोडे, विशाल वाबळे, प्रशांत वाळुंज, माऊली पाचारणे, निलेश रोडे आदी उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले की, तीन-चार दिवसांपूर्वी आंबेगाव व शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बारामती येथील गोविंदबाग येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले होते, त्यावेळी शरद पवार यांच्याशी आमची एक तास बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील घडामोडी विषयी माहिती घेतली. आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे रहाणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले.
तालुक्यात जाहीर सभा घ्यावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली त्यांनी सांगितले की लवकरच आंबेगाव तालुक्यामध्ये सभा घेण्यात येणार असून या सभेत ते जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील नेतृत्वाला सर्वांत जास्त झुकते माप दिले आहे तरी या नेतृत्वाने वेगळा विचार केला आहे. त्यांच्या विषयी ते परखड मत जाहीर सभेत व्यक्त करणार आहेत. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी हा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले.