रांजणी, (वार्ताहर) – नागापूर (ता.आंबेगाव) येथे पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी अनिता विशाल लोहकरे (तेरूंगण, ता. आंबेगाव) रुपये ३० हजार, चंद्रभागा बबन लोहकरे (राजापूर, ता.आंबेगांव ) रुपये १० हजार, सुषमा दौलत शिंदे (मंचर) रुपये १० हजार या निराधार महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
पार्वतीबाई कुंडलिकराव निकम सामाजिक प्रतिष्ठानचे हे दुसरे वर्ष आहे. समाजातील गोर गरीब घटकांना आर्थिक मदत करण्याचा उद्देश प्रतिष्ठानचा आहे. प्रतिष्ठानकडे या महिलांनी आर्थिक मदत मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यानुसार प्रतिष्ठानने मंगळवार (दि. ४) रोजी नागापूर येथे धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. के. निकम, बाळासाहेब महाराज खरमाळे, सरपंच गणेश यादव, प्रा.मधुकर वाघ, राजश्री निकम, ऊपसरपंच सुनील शिंदे, सखाराम महाराज भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यानच्या काळात सामाजिक प्रतिष्ठानने आळंदी येथील वारकऱ्यांसाठी प्रसादाचे वाटप ,
शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाल वाटप तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष खंडेराव निकम यांनी सांगितले. तसेच सरपंच गणेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्त प्राचार्य मधुकर वाघ यांनी प्रास्ताविक केले. के. के. निकम यांनी आभार मानले.