बारामती, (प्रतिनिधी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणार्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. जुन्या सहकार्यांच्या व नेतेमंडळींच्या गाठी भेटीवर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे पक्ष फुटीनंतर शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात बेरजेचे राजकारण करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या बेरजेच्या राजकारणात काका की पुतण्या भारी ठरणार हे 4 जून रोजी स्पष्ट होईल.
शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 16) माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. पाठीमागील आठवड्यात शरद पवार यांनी शामकाका काकडे व चंद्रराव तावरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीने देखील मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते. बाळासाहेब तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. सोबतच ते माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष देखील आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात
चर्चेला उधाण आलं आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर दुसरीकडे रष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरोधात भावजयी हाय व्होलटेज लढत होणार आहे. या लढती सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवारही दोन दिवसांपासून बारामतीत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत वेगळी वाट धरली आहे. पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देऊन त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
त्यामुळे अजित पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामतीतच असून त्यांनी विविध घटकांशी चर्चा, सभा, मेळावे, सांत्वनभेटींसह घेतल्या जात आहेत. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच बारामती लोकसभेची निवडणूक असल्याने रंगत वाढली आहे.