पेठ, (वार्ताहर) – गेली अनेक वर्षांपासून कारेगाव फाटा ते म्हसोबा माऊली मंदिर कारेगाव गावठाण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. कारेगाव तालुका आंबेगाव येथील गावाला जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
अनेक ठिकाणी उंच सखलपणा, मोठमोठे खड्डे या रस्त्यामध्ये आहेत. साधारणपणे ५०० मीटर लांबीचा हा रस्ता असून कारेगाव गावाला जोडणारा हा प्रमुख आणि एकमेव रस्ता आहे. रस्त्याची खूपच दुरवस्था झाल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या कारेगाव गावांमध्ये येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे कारेगावातील अनेक शेतकऱ्यांना आपला शेतीमाल ट्रॅक्टरने बाहेर काढावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे कारेगाव फाटा ते म्हसोबा माऊली गावठाण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कारेगावचे सरपंच सुमन कराळे, उपसरपंच पंढरीनाथ कराळे, माजी सरपंच विलास घेवडे, गणपत कराळे, महादेव कराळे, कारेगाव सोसायटी चेअरमन संजय कराळे व माजी चेअरमन पांडुरंग नाईकडे आदी ग्रामस्थांनी केली आहे.