स्व. राजीव गांधी रुग्णालयातील प्रकार; रिपोर्ट न देताच सेंटर बंद
येरवडा – खोकला असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला रिपोर्ट मिळवण्यासाठी रुग्णालयात दहावेळा जावे लागले. तरीही त्यांना रिपोर्ट मिळाला नाही अखेर तिच्या मुलाने अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारल्यानंतर त्यांच्या व्हॉट्स ऍपवर रिपोर्ट पाठविण्यात आला. या घटनेतून पालिकेने करार केलेल्या अशा सेंटरद्वारे रुग्णांच हेळसांड होत असल्याचे समोर आले आहे.
येरवडा येथील मलाम्मा शेट्टी (वय 58) यांना मंगळवारपासून (दि.30जुन) खोकला येत होता. येरवड्यातील भारतरत्न स्व.राजीव गांधी रुग्णालयात पालिका व क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि. यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे “डॉ. शाम प्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत डायग्नोस्टिक्स सेवा सुरू आहे. तेथे शेट्टी यांनी एक्स रे काढला. एक्स रे मिळाला मात्र त्याचा रिपोर्ट डॉक्टरांना पाहिजे होता. तो रिपोर्ट डायग्नोस्टिक सेंटरकडून दिला जात नव्हता अखेर शेट्टी यांच्या मुलाने चौकशी केली असता ते सेंटर बंद होते. सेंटरच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांनी रिपोर्टची सातत्याने मागणी केल्यानंतर व्हॉटसऍपवर रिपोर्ट पाठविण्यात आला.
दरम्यान, येरवडा परिसरातील नागरिकांना स्व.राजीव गांधी रुग्णालयाचा आधार वाटतो. परंतु, कधीही सेंटर बंद करणे, रिपोर्ट वेळेवर न देणे, सुट्टे पैसे नाही म्हणून तपासणी न करणे, रिपोर्ट पाहिजे असेल तर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जा, अशी उत्तरे दिल जातात. यामुळे क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि सेंटरबरोबर असलेला करार पालिकेने रद्द करावा, अशी मागणी मनोज शेट्टी यांनी केली.
क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरमधील टेक्निशियन करोनाबाधित झाल्याने तेथे दुसरा टेक्निशियन नसल्याने सेंटर बंद आहे. एक्स-रे टेक्न्शियन पदासाठी मुलाखती घेतल्या असून दोन दिवसांत ते सेंटर सुरु होईल.
– पराग सतरावकर, ऑपरेशन हेड, क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर