राजगुरूनगर -चांडोली (राजगुरूनगर) येथे ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत कोविड केअर सेंटर सुरू करण्याला प्रशासनाची परवानगी असूनही अद्याप सुरू झाले नाही. आठवडाभरात ते सुरू करावे अन्यथा चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या समोर खाटा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, खेड तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी दिला.
चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरची शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख यांनी बुधवारी (दि. 8) दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मुंढे,वैद्यकीय अधिकारी माधव कणकवले व अन्य स्टाफ उपस्थित होता. चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्याला मे मध्ये प्रशासनाकडून परवानगी आली होती.
दरम्यान येथे करोना स्वॅबची मशनरी उपलब्ध झाली आहे. 65 कॉट सज्यची व्यवस्था करण्यात अली होती. याला दोन महिने होऊनही येथे कोविड केअर सेंटर सुरु केले नाही. ते का सुरु केले नाही बुट्टे पाटील व देशमुख यांनी सविस्तर माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक मुंढे व कणकवले यांच्याकडून घेतली.
तालुक्यात म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरला दररोज 50 पेक्षा जास्त स्वॅब घेत नाहीत, त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेकांची अडचण होत आहे. ती दूर करण्यासाठी येथील सेंटर आठवड्यात तात्काळ सुरू करावे, तसे झाले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा बुट्टे पाटील व देशमुख यांनी दिला.
दरम्यान, बुट्टे पाटील व देशमुख यांनी प्रांताधिकारी संजय तेली यांची भेट घेतली असता तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला एक जास्त रुग्णवाहिका देऊन चांडोली येथे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले.
येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्याला आमची काहीही हरकत नाही; परंतु त्यासाठी कर्मचारी वर्ग (मॅनपॉवर) व खर्चाला निधी मिळाला नाही. करोना पेशंट वाढलेत हे सत्य आहे. दररोज ओपीडी 300 ते 400 पर्यंत होते. रुग्णवाहिका नाही, लॅब असिस्टंट नाही, तसेच 108 ला फोन केला तर रुग्णवाहिका मिळत नाही. अशा अनेक अडचणी आहेत.
-डॉ. दीपक मुंढे, वैद्यकीय अधीक्षक चांडोली ग्रामीण रुग्णालय