– प्रकाश गायकर
पिंपरी – ‘करोना’मुळे आनलाइन शिक्षणास सुरुवात झाली आहे. आर्थिक अडचणींमुळे कुठलेही मूल अशिक्षित राहू नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच स्तरांवर विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु “करोना’ने गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील तब्बल 58 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. तर 3 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही देखील नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या बहुतांश मुलांचे पालक मोजमजुरी करून घर चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे महागडे मोबाइल नाहीत. तर ज्या विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहेत ते विद्यार्थीही ऑनलाईन शिक्षणात सहभागी होत नसल्याने पिंपरी चिंचवड शहर ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत काठावर पास झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन व डिजिटल शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या ऑनलाईन शिक्षणातील अडचणी आता समोर येत आहेत. महापालिकेच्या शाळांची स्थिती तर आणखीच बिकट आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण 105 शाळा आहेत. या शाळांमध्ये जून महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणानुसार 39,532 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महापालिकेच्या शाळेत गोरगरीब, मजूर, कष्टकऱ्यांचीच मुले शिक्षण घेतात. हातावरचे पोट असलेल्या कुटुंबातून आलेल्या मुलांकडे मोबाईल उपलपब्ध नाहीत. 39 हजार 530 मुलांपैकी फक्त 16570 म्हणजेच 41.91 टक्के मुलांकडेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, त्यांच्याकडे रेडिओ आहेत. तर 38,416 म्हणजेच 97.17 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही आहेत. तसेच तब्बल 1116 विद्यार्थ्यांच्या घरी यापैकी काहीच उपलब्ध नाही. त्यामुळे जोपर्यंत करोनाचे सावट आहे तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचितच राहावे लागणार आहे.
शिक्षणाच्या वाटेत अनेक अडचणी
ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत शहरातील परिस्थिती फारशी चांगली नाही. अनेकांकडे साधने उपलब्ध असूनही ते त्याचा वापर करत नाहीत. त्यामध्येही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे ते वापऱणे त्यांना शक्य होत नाही. शहरातील एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 13,939 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात सहभागी होत आहेत. म्हणजेच फक्त 35 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात सहभागी होतात. उर्वरित 65 टक्के विद्यार्थी यामध्ये सहभागी होत नाहीत. त्यांना अनेक अडचणी असतात. त्यामध्ये घरामध्ये फक्त एकच मोबाइल असणे. अनेकदा रेंज उपलब्ध होत नाही. तर बहुतांश विद्यार्थ्यांकडे असलेल्या मोबाइलमध्ये इंटरनेट नसते. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही ऑनलाईन शिक्षणामध्ये सहभाग घेता येत नाही.
सद्यस्थितीत बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात सहभागी होत नाहीत. अनेकांकडे मोबाईल आहेत, मात्र त्यामध्ये इंटरनेट नाही. तसेच एका घऱात एकच मोबाइल असल्याने तो घरातील मोठ्या माणसांकडे असतो. त्यामुळे मुलांना सहभाग घेता येत नाही.
– ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
विविध ऍपच्या माध्यमातून शिक्षण
ऑनलाईन शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काही ऍप विकसित करण्यात आले आहेत. तसेच राज्य शासनाने विकसित केलेले ऍप देखील वापरण्यात येते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संवादासाठी व्हाटसअपचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यावर विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जातो. तो ग्रुपवर विद्यार्थी पाठवतात. तो चूक की बरोबर याची माहितीही ग्रुपवरच दिली जाते. विविध पाठांचे ऑडिओ व व्हिडिओ तयार करून ते ग्रुपवर पाठवले जातात. त्याचा अभ्यास विद्यार्थी करतात. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय कमी आहे.
अवघे 35 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात सहभागी
3 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी टिव्हीही नाही
58 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत