बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

शिवसेनेच्या बारणे यांच्या अडचणीत वाढ

थेरगाव – श्रीरंग बारणे हे खासदार असून थेरगावच्या विकासाकडे त्यांनी दूर्लक्ष केल्याचा आरोप करत बारणे यांच्या कुटूंबातीलच अनेक सदस्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. बापुजीबुवा मंदिरा समोर झालेल्या कार्यक्रमात बारणे कुटूंबियांनी पार्थ यांना पाठींबा देत थेरगाव भागातून 80 टक्के मतदान करण्याचे अभिवचन दिले. अचानकपणे आज घडलेल्या या घडामोडींमुळे थेरगावात राजकीय भूकंप झाल्याची चर्चा रंगली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे आज थेरगाव परिसरात प्रचारानिमित्त आले असता, बारणे कुटूंबातील सदस्य निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगावमधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्वांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत करताना उमेदवार पार्थ पवार यांनी पाठींब्याबाबत आभार मानले. अत्यंत चुरशीच्या लढतीत बारणे यांच्या कुटूंबातील आणि थेरगावात प्रतिष्ठीत असलेल्या बहुतांश बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने हा शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना धक्का मानला जात आहे.

पाठींबा दिल्यानंतर बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची विकास कामे या भागात केली नाहीत. थेरगावमध्ये अनेक प्रश्‍न आहेत मात्र कोणतेच प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आमचं आडनाव जरी बारणे असलं तरी संपूर्ण थेरगाव मधील बारणेंचा पाठिंबा हा पार्थ पवार यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. थेरगाव परिसरातून आम्ही पार्थ यांना 80 टक्के मतदान घडवून आण्याची जबाबदारी आता आम्ही घेतली असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी थेरगाव मधील सर्व बारणे हे आपली ताकद लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.