पारनेर – पारनेर तालुक्यात शिवसेना-भाजप एकत्र असल्याचे चित्र वारंवार दिसत आहेत. भाजपचे खासदार सुजय विखे यांनी देखील राज्यात महाविकास आघाडी असली तरी तालुक्यात मात्र भाजप सेना एकत्र असल्याचे विधान केले होते.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. त्या धर्तीवर तालुक्यातील जुने शिवसैनिक व पहिले तालुकाप्रमुख गुलाबराव नवले यांनी तालुका शिवसेनेवर गंभीर आरोप करीत शिवसेनेचे पदाधिकारी हे खासदार विखे यांच्या मागेपुढे लाळघोटेपणा करीत आहेत, असा आरोप केला यामुळे तालुका शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
माजी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले यांनी सोशल माध्यमांद्वारे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत म्हटले आहे की खासदार विखे यांच्या अवतीभवती पदाधिकारी लाळघोटेपणा करीत आहेत तर दुसरीकडे केंद्रातील मंत्री मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करताना दिसत आहेत.
तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अनेक कार्यक्रमात खासदार विखे यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही टीका केली गेली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले नाही, उलट या प्रश्नाला बगल देण्याचे काम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे गुलाबराव नवले यांनी केलेला आरोप खरा असल्याचे बोलले जात आहे. राज्यामध्ये महाविकास विकास आघाडी असताना तालुक्यात मात्र शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या खासदार आणि सोबत दिसत असल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण येत आहे.