राजगुरूनगर -चाकण एमआयडीसीमधील वाघजाईनगर(खराबवाडी, ता. खेड)मधील पार्क्सन पॅकेजिंग लिमिटेड कंपनीतील काही कामगार करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत स्थानिकांच्या आणि कामगारांच्या आलेल्या तक्रारीवरून प्रशासकीय अधिकारी कंपनीत गेले असता त्यांना व्यवस्थापनाने अरेरावी करीत हाकलून लावले.
हे कामगार वाघजाईनगर ग्रामपंचायत हद्दीत राहत आहेत कंपनीत सुमारे हजार कामगार आहेत त्यापैकी जवळपास 13 कामगार पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबातील 8-10 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासनापासून पॉझिटिव्ह कामगारांची माहिती लपविणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल शेलार, ग्रामस्थ शशिकांत सावळे,रमेश शितोळे, अनिल चव्हाण, भरत बोडके यांनी खेड पंचायत समितीकडे निवेदनाव्दारे मंगळवारी (दि. 11) केली आहे.
मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी शिफारस
कंपनीतील कोविड व्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे गेले असता कंपनी व्यवस्थापनाने अरेरावी करून बाहेर काढण्याचा प्रताप केला आहे. कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस जिल्हाधिकऱ्याकडे करण्यात येणार असल्याचे राक्षे, जोशी यांनी सांगितले.