भिगवण -येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनावरून बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटात श्रेयवाद रंगला आहे. दीड महिन्यांत पाटील गटाने भरणे गटांवर सरशी केल्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये कोविड सेंटर आणि संबंधित इमारतीच्या श्रेयवाद चांगलाच पेटल्यामुळे आरोग्याची धन्वंतरी कोविड सेंटरमध्ये राजकीय आखाडा बनला आहे.
भिगवण हे गाव मोठ्या लोकसंख्येचे आहे. परिसरात जादा गावे असल्याने नागरी सुविधांची गरज नेहमीच “अधोरेखित’ झाली आहे. गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघातांची संख्या मोठी आहे. जखमींची संख्या तसेच स्थानिक नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे ट्रॉमा केअर सेंटरची मागणी केली होती. पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरसाठी इमारत मंजूर करून घेतली होती.
2014 मध्ये ट्रॉमा केअरच्या भूमिपूजनाचा समारंभ तत्कालीन सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे हे आमदार झाले. बांधकामाचा शुभारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला होता. इमारतीच्या बांधकामापासून ट्रॉमा केअर हे राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. त्यातच दोनवेळा भूमिपूजन व दोन उद्घाटने या इमारतीच्या नशिबी आली आहेत.
दरम्यानच्या काळात ट्रॉमा केअरची सुसज्ज इमारत उभी राहिली. परंतु वापराविना पडून होती.
महामारीत कोविड सेंटरची मागणी जोर धरली. यासाठी पंचायत समितीतील सत्ताधारी भाजप व राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीने त्यांच्या स्तरावरून प्रयत्न केले आहेत. भरणे यांच्या माध्यमातून सेंटरची मान्यता घेतली. प्रोटोकॉलनुसार भरणे यांच्या हस्ते (दि.8) कोविड सेंटरचा उद्घाटन सोहळा ठरला होता. परंतु त्याचदिवशी दुपारी पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी सभापती व उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन करून भरणे गटाला धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्थवस्थता पसरली.
पाटील गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे भाजपला आपसूक श्रेय मिळाले. पाटील यांच्या माध्यमातून इमारत बांधली आहे. पंचायत समितीने मागणी केली होती. या कारणास्तव उद्घाटन समारंभ घेतला. दरम्यान, भरणे यांनी उद्घाटन सोहळ्यात भाजपावर टीका करून प्रति आव्हान दिले आहे. त्यामुळे उपचारापेक्षा औषध भंयकर म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
करोना काळात राष्ट्रवादीची पीछेहाट
सायंकाळी पुन्हा सार्वजानिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यथासांग उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी इमारतीच्या बांधकामासाठी व कोविड केअर सेंटरसाठी केलेल्या प्रयत्नाचा आढवा घेत भाजपावर टीका केली. त्यामुळे एकूणच ही इमारत भूमिपुजनापासूनच श्रेयवादाचा राजकीय आखाडा बनला आहे. इंदापूर तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सातत्याने कलगीतुरा रंगत आहे. त्यामध्ये दुधाचे राजकारण, दूधगंगा संघाचा वाद पेटला होता. भाजपकडून राज्यमंत्र्यांनी खेळलेल्या सुरफाट्यांवरही टीका करण्यात आली होती. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हर्षवर्धन पाटील आणि राज्यमंत्री भरणे यांनी सोडली नाही.