दखल- पानिपत : मराठ्यांची शौर्यगाथा

विठ्ठल वळसे पाटील

पानिपतचा रणसंग्राम मराठ्यांचा पराभव म्हणूनच सांगितला जातो. मराठा सरदारांचे शौर्य पहिले तर जगाच्या पाठीवर असा इतिहास मिळणार नाही. हा खरा विजय असून पराक्रमाची गाथा आहे. संक्रांतीच्या दिवशी पानिपतावर मराठे अब्दालीसारख्या परकीय आक्रमकांशी लढताना वीरगती झाले.

पानिपत हा ऐतिहासिक रणसंग्राम हिंदुस्थानच्या बदलत्या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा टप्पा होता. मराठ्यांचे पानिपत झाले, असा जो सूर आळवला जातो तो खरंच सत्य आहे का? मराठा साम्राज्य विस्तार व अखंड हिंदुस्थानावर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका फडकवताना पानिपतच्या रणसंग्रामात धारातीर्थ पडलेल्या मराठा सैनिकांचा तो रक्‍तशृगांर होता. भर मकरसंक्रांतीच्या सणाच्या दिवशी झालेला हा रणसंग्राम हिंदुस्थानाला नवा अध्याय देऊन गेला. वारंवार होणाऱ्या आक्रमक टोळ्या पुन्हा येण्याचे धाडस करू शकल्या नाहीत, त्यामुळे हा खरा विजय आहे.

दख्खन प्रांतांतील मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रावर चालून आलेला औरंगजेब महाराष्ट्रातच मरण पावला. त्यामुळे दिल्ली दरबारात औरंगजेबानंतर त्याच्या मुलांत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. याच काळात श्रीमंत थोरल्या बाजीरावांनी पेशवाईची सूत्रे हाती घेऊन 20 वर्षांत “अटक ते कटक’ असे मराठा साम्राज्य विस्तारले होते. हे करत असताना दिल्लीतील सत्ता नाममात्र झाली. अटकेपार झेंडा मराठा साम्राज्याचा फडकला होता. 1758 साली दिल्ली काबीज करून पंजाब प्रांतावर चढाई करून तिमूरशहा दुराणी यास पिटाळून लावले. तिमूरशहा हा अहमदशा अब्दालीचा मोठा पुत्र होता. थेट अब्दालीच्या साम्राज्याला आव्हान दिले होते. 14 जानेवारी 1761 रोजी अफगाणचा बादशहा अहमदशा अब्दाली आणि दिल्लीची पातशाही पुन्हा मिळवण्यासाठी नजीब-उद-दौला यांच्याशी सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांबरोबर झालेले पानिपतचे तिसरे युद्ध होय.

पानिपत हे शहर हरियाणा राज्यात वसलेले आहे. दिल्ली ते चंदीगड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वरील शहर असून ते दिल्लीपासून 90 किमी अंतरावर आहे. महाभारत काळात वाट्याला आलेल्या भागात पांडवांनी पाच शहरे स्थापित केली. त्यापैकी पांडुप्रस्थ म्हणजे आजचे पानिपत होय. 15 जानेवारी 1761 तिसरं रणसंग्राम मराठे विरुद्ध अब्दाली यांच्यात झाले. यात मराठा साम्राज्याची फार मोठी हानी झाली ती परत कधीच भरून आली नाही.

1759 मध्ये अब्दालीने पश्‍तून, बलूच आणि अफगाण जमातींमधून सैन्याची फळी उभी केली. आणि पंजाब प्रांतात असलेल्या लहान लहान मराठा चौक्‍यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानातील ज्यांचा मराठा साम्राज्याशी कलह होता, असे आणि रोहिला अफगाणांसोबत संधान साधून मराठ्यांविरुद्ध एक व्यापक फळी निर्माण केली. दिवसागणिक अब्दालीचा उपद्रव वाढत होता. 1757 सालात रघुनाथ पेशव्याने दिल्लीचा ताबा घेतला यात नजीबखान रोहिल्यास पकडले पण मल्हारराव होळकरांच्या शिष्टाईने रघुनाथरावांनी त्यास अभय दिला. हाच अभय पुढे मराठ्यांना नडला. रघुनाथराव दक्षिणेकडे फिरताच नजीबखान रोहिल्याने अब्दालीस मदतीस बोलावले आणि अब्दालीने 1759 साली अखेर साबाजी शिंद्यांच्या ताब्यातून पंजाब घेतला. त्यास रोखण्यास मराठा सरदार दत्ताजी शिंदे मदतीस आले. 10 जानेवारी 1760 मध्ये दिल्लीजवळील बुराडी घाटात नजीमखान व अब्दालीने गाठले. नजीमखानाच्या गोळीबाराने दत्ताजी मरण पावले. इकडे पंजाब हातून गेल्याची व दत्ताजी पडल्याची खबर मिळताच नानासाहेब पेशवा यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी उत्तरेत सैन्य पाठवले.

तिजोरी रिकामी असतानाही त्यांनी उत्तरेत विशाल सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. या सैन्याचे सेनापती सदाशिवरावभाऊ होते. त्यांच्या सोबतीला नानासाहेबांचा मोठा मुलगा विश्‍वासराव यास पाठवले. मार्च 1760 साली उत्तरेस कूच केली. तोफखाना प्रमुख म्हणून इब्राहिम गारदी हा होता. घोडे, हत्ती, सैन्य दल तसेच, स्वयंपाकी होते. याशिवाय धार्मिक कार्यानिमित्त अनेक वृद्ध, महिला, मुले व बुणगे सोबतीला निघाले. हीच युद्धातील महत्त्वाची अडचण ठरली. उत्तरेत गेल्यावर होळकर व शिंदे यांचे सैन्य मिळाले. ऑगस्ट 1760मध्ये पुन्हा मराठ्यांनी दिल्ली काबीज केली.
अखेर 14 जानेवारी 1761 अर्थात पौष शु. अष्टमीला युद्धाचा आरंभ झाला. मराठा सरदार सैन्य निकराचा हल्ला करत दुपारपर्यंत निशाण सांभाळले अखेरच्या टप्प्यात मराठ्यांच्या शिंदेच्या सैन्याने नजीबखानवर हल्ला केला.

नजीब बचावात्मक पवित्रा घेत राहिला. सदाशिवभाऊ आणि शहावली एकमेकांना भिडले. यात भाऊंनी आपली शिकस्त केली यशवंतराव पवारने अताईखानास व त्याच्या 3 हजार सैन्यास पाणी पाजले. विश्‍वासराव पडल्याची खबर भाऊंच्या कानावर पडली. म्हणून भाऊ हत्तीवरून घोड्यावर स्वार होत मैदानात शिरले. अशा अवस्थेत भाऊ जखमी झाले आणि रणधुमाळीत बेपत्ता झाले. भाऊ अंबारीत दिसत नाही म्हणून सैन्याने कच खाल्ली. आता मात्र पारडे फिरले होते. अनेक सरदार पडले. अनेकांनी काढता पाय घेतला. रक्‍ताचा चिखल झाला होता. अब्दालीने निसटता विजय मिळवला. हजारो बाजार बुणग्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

दोन मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या लढाईचं वर्णन केलं गेलं. प्रेताचे ढीग तर रक्‍ताचे पाट वाहत होते. यामुळे नानासाहेब खचले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आता मराठ्यांना नेता उरला नव्हता. पुन्हा एकदा माधवरावांच्या नेतृत्वाने व महादजी शिंदे यांनी मराठेशाही
उभी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.