Pakistan – पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी हे दुसऱ्यांदा पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. पाकिस्तानच्या संसदेने आणि प्रांतीय विधीमंडळांनी शनिवारी अध्यक्ष निवडीसाठी मतदान केले.
संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये झरदारी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. अध्यक्षीय निवडणुकीमध्ये झरदारी यांना २२५ मते मिळाली, तर त्यांचे विरोधी उमेदवार असलेल्या अचकझाई यांना ११९ मते मिळाली.
झरदारी हे पीपीपी आणि पीएमएल-एन या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. तर सुन्नी इत्तेहादुल कौन्सिलचे उमेदवार म्हणून महमूद खान अचकझाई हे रिंगणात होते. डॉ. आरिफ अल्वी यांची ५ वर्षांची मुदत गेल्या वर्षीच संपली आहे.
मात्र नवीन विधीमंडळ अस्तित्वात न आल्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्ष निवडले गेले आहेत. संसद आणि प्रांतीय विधीमंडळांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे मतदान आज सकाळी ११ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत पार पडले.
अचकझाई हे पश्तुनख्वा मिल्ली आवामी पार्टीचे अध्यक्ष असून पीटीआयचे अपक्ष सदस्य सामील झालेल्या सुन्नी इत्तेहादुल कौन्सिलच्यावतीने अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रीयेबद्दल आक्षेप असला तरी आपला पक्ष अद्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेत असल्याचे पीटीआयचे नेते अली जाफर यांनी सांगितले.
संसदेचे वरिष्ठ सभागृह , पंजाब प्राताचे विधीमंडळ आणि बलुचिस्तानचेच्या विधीमंडळामध्ये बहुमत असल्यामुळे सत्तारुढ आघाडीचे नेते झरदारी यांना विजयाचा पूर्ण विश्वास आहे. २००८ ते २०१३ या कालावधीमध्ये ते पाकिस्तानचे अध्यक्ष राहिलेले होते. दुसरीकडे विरोधकांना केवळ खैबर पख्तुनख्वा प्रांतात बहुमत आहे.
निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी…
अध्यक्षपदासाठीच्या विधीमंडळ मतदारसंघांची रचना अपूर्ण असल्यामुळे अध्यक्षीय निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अचकझाई यांनी मतदानाच्या काही तास आगोदर पाकिस्तानच्या निडणूक आयुक्तांकडे केली होती.
संसदेतील आणि काही प्रांतातील काही राखीव जागा अजूनही रिक्त असल्याचे त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. विधीमंडळातील जागा रिक्त असताना अध्यक्षीय निवडणुका घेणे बेकायदेशीर आणि राज्यघटनेच्या तत्वांच्याविरोधात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.