नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न तुर्कीयेने सुरू केले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांच्या तुर्कीये भेटीदरम्यान तेथे एक शांतता परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव तुर्कीयेचे अध्यक्ष इर्दोगन यांनी ठेवला आहे. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चांगले संबंध अपेक्षित असल्याने तुर्कीयेने या शांतता परिषदेचा प्रस्ताव ठेवला आहे. इर्दोनगन यांनी यापूर्वी देखील अनेकदा रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी मांडलेल्या शांतता परिषदेला रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा इर्दोगन यांनी झेलेन्सकी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
रशियाशी थेट चर्चा न करण्याच्या भूमिकेवर झेलेन्सकी ठाम आहेत. यापूर्वी रशियाशी अनेकदा चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आता रशियाने चर्चेसाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी पूर्वी मांडलेल्या १० मुद्यांवरच चर्चा व्हायला हवी, असे झेलेन्सकी म्हणाले.
झेलेन्सकी यांनी मांडलेल्या १० मुद्यांमध्ये अन्न सुरक्षा, युक्रेनच्याभौगोलिक स्वायत्ततेला पुन्हा बहाल करणे, रशियाच्या सैन्याची माघार, तुरुंगातील कैद्यांची सुटका, आक्रमणाला जबाबदार असलेल्यांविरोधात कायदेखील खटले आणि युक्रेनसाठी सुरक्षेची हमी आदी मागण्यांचा समावेश आहे. रशियाच्या पदाधिकाऱ्यांशी या मुद्यांवर चर्चा केली जाईल, असे इर्दोगन यांनी म्हटले आहे.
तुर्कीयेच्या भेटीदरम्यान इर्दोगन आणि झेलेन्सकी यांनी काळ्या समुद्रातील बंदराला भेट दिली. तेथून युक्रेनमधील धान्याची युरोपात निर्यात केली जाणे अपेक्षित आहे.युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी अलिकडेच लिथुआनियामध्ये फ्रान्स, लिथुआनिया, लॅटविया आणि इस्टोनियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी युक्रेनला मिळत असलेल्या तुटपुंज्या मदतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.