नवी दिल्ली – अभिनेता कमल हसन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने तामिळनाडुतील द्रमुक आघाडीत सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. कमल हसन यांनी गेल्या सहा वर्षात या राज्यात स्वबळावर निवडणूका लढवल्या हेात्या पण त्यांनी आता इंडिया आघाडीत सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे.
या पक्षाला तामिळनाडुत काही जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. कमल हसन आणि द्रमुक अध्यक्ष मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी डीएमके मुख्यालय असलेल्या अण्णा अरिवल्यम येथे आपसातील कराराला अंतिम रूप दिले.
करारानंतर पत्रकारांशी बोलताना हसन म्हणाले की, युतीमध्ये सामील होण्याचे त्यांचे पाऊल देशाच्या फायद्यासाठी केले गेले आहे आणि कोणत्याही पदाचा विचार करण्यासाठी नाही. देशासाठी आम्ही एकत्र येण्याची गरज होती ती जबाबदारी मी पार पाडली आहे. सत्तेच्या पदाचा मी विचार करीत नाही. मला देशाचे राजकारण महत्वाचे वाटते.
कमल हसन यांनी २०१८ मध्ये आपला पक्ष मोठ्या धूमधडाक्यात सुरू केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुका या पक्षाने स्वबळावर लढवल्या, परंतु दोन्ही प्रसंगी डीएमकेच्या नेतृत्वाखालील गट विजयी झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला.
दरम्यान द्रमुक आणि कॉंग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा विषयही अंतिम टप्प्यात आला असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.