इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज दोन दिवसांसाठी रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. गेल्या दोन दशकांमध्ये रशियाच्या दौऱ्यावर जाणारे ते पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान आहेत. या दौऱ्यादरम्यान इम्रान खान हे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी महत्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करणार आहेत. इम्रान खान यांच्याबरोबर उच्चस्तरिय शिष्टमंडळ आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यही रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
इम्रान खान आणि पुतीन यांच्यातील द्विपक्षी. चर्चेदरम्यान उर्जा सहकार्यासह अन्य क्षेत्रांमधील सहकार्याचा मुद्दाही उपस्थित होणार आहे. याशिवाय इस्लामोफोबिया आणि अफगाणिस्तानमधील स्थितीसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य मुद्यांवरीही चर्चा होणार आहे.
रशिया आणि युक्रेनदरम्यान तणाव वाढलेला असताना इम्रान खान यांचा हा दौरा म्हणजे पाश्चात्य देशांसाठी एक संदेश आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्यास अमेरिकेला नकार देऊन पाकिस्तान रशियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत.