Pakistan | Election – पाकिस्तानात आज संसदेच्या आणि प्रांतीय विधानसभांच्या २१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसाचार झाला. तणावाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पंजाब आणि बलुचिस्तानमधील काही जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट बंद केले होते.
आज संसदेच्या ५ जागांसह पंजाब विधानसभेच्या १२, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान विधानसभेच्या प्रत्येकी २ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचे मतदान आज झाले. या ठिकाणी हिंसाचार आणि १३ जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट बंद असल्यामुळे असंतोषाचे वातावरण होते, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
पंजाब प्रांतातील निजामपूर येथील मतदान केंद्रामध्ये गोळीबार झाल्यामुळे मतदान थांबवण्यात आले. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. लाहोरमध्ये पीटीआय आणि पीएमएल-एन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
आपल्या कार्यकर्त्यांना अटक केली गेल्याची तक्रार सुन्नी इत्तेहादुल कौन्सिलने केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मतदानात गैरप्रकार केला जात असल्याची तक्रार एसआयसी आणि पीटीआयच्यावतीने याही वेळी केली.