मुंबई – अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि युक्रेनमधील संघर्षामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबराच भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदी-विक्रीचा लाटा चालूच आहेत. आता निर्देशांक बऱ्याच खालच्या पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे बुधवारी निर्देशांक सकाळी वाढले होते. मात्र दुपारी विक्री वाढून निर्देशांकांत घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 68 अंकांनी कमी होऊन 57,232 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 28 अंकांनी म्हणजे 0.12 टक्क्यांनी कमी होऊन 17,063 अंकांवर बंद झाला.
अमेरिका आणि युरोपने आर्थिक निर्बंध घातल्यामुळे आता रशिया ताठर धोरण कमी करेल असे वाटल्यामुळे सकाळी आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. नंतर रशिया आक्रमक राहणार असल्याचे दिसून आल्यानंतर धिर सोडून गुंतवणूकदारांनी विक्री केली.
एनटीपीसी, एल अँड टी, नेस्ले, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक मात्र कमी पातळीवर आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मत्र्यांबरोबर चर्चा करणार होते. मात्र त्यासाठी रशियाने आक्रमण न करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र रशियन फौजा युक्रेनच्या बंडखोर प्रांतात गेल्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी ही बैठक रद्द केली आहे. काल क्रुडचे दर 99 डॉलरपर्यंत गेले होते. त्यामध्ये घट होऊन आता ते 96 डॉलर प्रति पिंप या पातळीपर्यंत खाली आले आहेत.