PAK vs NZ – टी-२० विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना बुधवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड ( PAK vs NZ ) यांच्यात खेळला गेला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला ७ गडी राखून धूळ चारली. पाकिस्तानचा संघ आता विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यानंतर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी दुसऱ्या संघाचे नाव मिळणार आहे.
“मला वाटतं इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल होईल”, केविन पीटरसनचं वक्तव्य!
आजच्या ( PAK vs NZ ) सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डॅरिल मिचेलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंड संघाने २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या. प्रत्यत्तरात पाकिस्तानच्या संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून १५३ धावा करत ७ गडी राखून विजय मिळवला. सामन्यात पाकिस्तानच्या सलामी जोडीची चमक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आत्तापर्यंत स्पर्धेत शांत असलेल्या या जोडीने न्यूझीलंडविरुद्ध शतकीय भागीदारी रचत पाकिस्तानच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.
न्यूझीलंडच्या १५२ धावांच्या प्रत्यत्तरात मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी पहिल्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी केली. सामन्यात सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी खेळल्या. यामध्ये बाबर आझमने ४२ चेंडूत ५३ तर मोहम्मद रिझवानने ४३ चेंडूत ५७ धावा केल्या. तसेच मोहम्मद हॅरिसने ३० धावांची उपयुक्त खेळी खेळली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने २ तर मिचेल सँटनरने एक गडी बाद केला.
सामन्यात ( PAK vs NZ ) पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार केन विल्यमसनने ४२ चेंडूत एका षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. तर डॅरिल मिचेलने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. शेवटी फलंदाजीस येऊन जेम्स नीशमने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने २ बळी घेतले, तर मोहम्मद नवाजला गडी बाद करण्यात यश आले.
A sensational performance from Pakistan in the knockout game ⚡#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLy12f pic.twitter.com/fTq6RoaLMu
— ICC (@ICC) November 9, 2022
पाकिस्तान संघ आता टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे आता दुसरीकडे भारत इंग्लंडचा पराभव करणार आणि अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार, असे तथ्य लावले जात आहेत. भारत आणि इंग्लंडचा सामना गुरुवारी ऍडिलेडच्या ओव्हल मैदानावर दुपारी १.३० वाजता खेळला जाणार आहे.