कराची – कर्णधार बाबर आझमचे नाबाद दीडशतक तर सर्फराज अहमदचे अर्धशतक यांच्या जोरावर यजमान पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ( PAK vs NZ ) कसोटीत सोमवारी पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात 5 गडी गमावून 317 धावा केल्या. बाबरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या डावाती सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर इमाम उल हक 24, अब्दुल्ला शफिक 7, शान मसुद 3 आणि सौद शकिल 22 धावा काढून परतले.
तेव्हा पाकिस्तानची 4 बाद 110 अशी बिकट स्थिती बनली होती. त्यानंतर मात्र, बाबर व सर्फराज ही जोडी जमली व त्यांनी डाव सावरताना संघाला अडीचशे धावांपेक्षा जास्त मजल मारुन दिली. दरम्यान या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण केली. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या बाबरने थाटात शतक साकार केले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 196 धावांची भागीदारी केली.
अखेरची चार षटके बाकी असताना सर्फराज 86 धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या आघा सलमानने बाबरला साथ देत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 5 बाद 317 धावा केल्या आहेत. बाबरने 277 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 161 धावांची खेळी केली. सलमान 3 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल व एजाज पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.