निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महासंचालक जयस्वाल यांनी घेतला आढावा
नगर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी निवडणुकीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा घेतला.
पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी नाशिक येथील आढावा घेतल्यानंतर ते शिर्डीला आले होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी नगरला पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. यावेळी त्यांच्याबरोबर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडून निवडणुकीच्या दृष्टीने नियोजनाची माहिती घेतली. निवडणूक बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्थेबाबत काही सूचनाही त्यांनी केल्या. सुमारे अर्धातास बैठक झाली. रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.