मोरीचे कठडे गायब : वाहनचालकांनी केली रस्ता दुरुस्तीची मागणी
भाटघर – भोर तालुक्यातील भोर-कापूरहोळ हा रस्ता अतिवर्दळीचा असल्याने महत्त्वाचा मानला जातो. भोरपासून पुण्याकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्याच्या दरम्यान एकूण 18 मोऱ्या असून आळंदे गावाजवळील मोरीचे कठडे गायब झाले असल्यामुळे मोऱ्या धोकादायक बनल्या आहेत. तसेच येथील फुटपाथही गायब झाले असल्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी लवकरात लवकर रस्ताची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
या रस्त्यावरील अनेक जुनाट झाडे धोकादायक बनली आहेत. तर या रस्त्यावर कायमस्वरूपी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. हा रस्ता जीवघेणा झाला असून वाहनचालक जीव मुठीत धरुन वाहन चालवत आहेत. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
भोर-कापूरहोळ हा रस्ता 14 किलोमीटर अंतराचा असून या रस्त्यावर माळवाडी बसथांबापासून पुण्याच्या दिशेने अंदाजे दीड किलोमीटर अंतराच्या दरम्यान मोठ-मोठी अनेक जुनाट झाडे आहेत. मागील चार महिन्यांत पाच झाडे रस्त्यावर अचानक कोसळली आहेत. यामध्ये अंगावर झाड कोसळल्याने एक युवक गंभीर जखमी झाला होता. जुनाट झाडे तोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे भीम आर्मी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या रस्त्यावर वर्षांतून तीन ते चार महिने वगळता कायमस्वरूपी खड्ड्यांचे जाळे पसरलेले दिसून येत आहे. खड्डे चुकवताना अनेक अपघात होत आहेत. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे विकार होत आहेत. याबरोबर वाहनांचेही नुकसान होत आहे. यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांनी
केली आहे.
या रस्त्यावर माळवाडी बस थांब्यापासून पुण्याच्या दिशेने दीड किलोमीटर अंतराच्या दरम्यान मोठ-मोठी झाडे जुनाट झाल्याने धोकादायक झाली आहेत. येथे अचानक झाडे कोसळत आहेत. ही झाडे न तोडल्यास आंदोलन करण्यात येईल.
– महिंद्रा साळुंखे, अध्यक्ष भोर तालुका भीम आर्मी संघटना
आळंदे गावाजवळ मोरीचे कठडे गायब झाले असून किंचितही फुटपाथ राहिला नाही. दोन्ही बाजूला दरीचे स्वरूप निर्माण झाले असून याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी.
– किशोर बांदल, सदस्य, ग्रामपंचायत आळंदे (ता. भोर)