एकाच दिवसांत तब्बल 186 जणांना बाधा
तिघांचा मृत्यू; रुग्णसंख्येने ओलांडली दोन हजारांची संख्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून आज शहरातील बाधितांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला. गेल्या 24 तासात तब्बल 186 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 171 जणांचा तर शहराबाहेरील 15 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2034 वर पोहोचली असून मृतांची संख्या 60 वर पोहोचली आहे.
महापालिकेच्या मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार शहरातील 171 जणांना तर शहराबाहेरील 15 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील बाधितांमध्ये बाधितांमध्ये 102 पुरुषांचा आणि 69 महिलांचा समावेश आहे. शहराबाहेरील रुग्णांमध्ये 8 पुरुषांचा आणि 7 महिलांचा समावेश आहे.
आजचे बाधित रुग्ण हे नढेनगर काळेवाडी, सिद्धार्थनगर दापोडी, नेहरूनगर, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, दापोडी, पिंपळे गुरव, आनंदनगर चिंचवड, सानेवस्ती चिखली, भोसरी, इंद्रायणीनगर, काळेवाडी, जुनी सांगवी, थेरगाव, बौद्धनगर पिंपरी, बिजलीनगर, विठ्ठलनगर, गांधीनगर, भाटनगर, साईचौक बोपखेल, लिंकरस्ता पिंपरी, कासारवाडी, निगडी, इंदिरानगर, मोरवाडी, वाकड, रहाटणी, वाल्हेकरवाडी, चिखली, मिलिंदनगर, दिघी, मुंजोबा वसाहत चिंचवड, कामगारनगर पिंपरी, कासारवाडी व इतर परिसरातील रहिवाशी आहेत. तर शहराबाहेरील रुग्ण हे वारजे मावळवाडी, गणेशखिंड, बोपोडी, टिंगरेनगर विश्रांतवाडी, रास्तापेठ पुणे, खडकी, औंध, कसबापेठ आणि दौंड या परिसरातील आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील दोघांचा तर बाहेरील एकाचा समावेश आहे. शहरातील जुनी सांगवी येथील 72 वर्षीय आणि अजंठानगर चिंचवड येथील 47 वर्षीय इसमाचा समावेश आहे. तर कोथरुड पुणे येथील 47 वर्षीय महिलेवर “वायसीएम’मध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मयतांची संख्या 35 वर तर शहराबाहेरील मयतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील 1197 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 123 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. दिवसभरात 127 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
शहरात आजपर्यंत 1197 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या शहरातील 792 रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शहरातील रहिवाशी नसलेल्या 76 जणांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयात 6 करोनाबाधित 4 मुक्त
जिल्हा रुग्णालयात मंगळवारी 6 करोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, 4 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बाधित रुग्ण हे पुणे, कोथरुड, बोपोडी, घोडेगाव, उर्से परिसरातील आहेत. तर, करोनामुक्त झालेले रुग्ण हे पुणे, औंध, दापोडी, कुसुर (ता. जुन्नर) येथील आहे. घोडेगाव (जि. पुणे) येथील एकाच कुटुंबातील दोघांना करोनाची लागण झाली आहे. 18 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 70 जणांना घरी सोडले आहे.