सातारा – बनावट कागदपत्रे सादर करुन, सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील पुनवडी येथील सर्व्हे नं. 46/8 व 47/4 मधील खाणपट्टा, स्टोनक्रशर आणि उरमोडी धरणालगत सौ. आशा राजू भोसले आणि सौ. पल्लवी संतोष भोसले यांनी बेकायदेशीररित्या बांधलेल्या फार्म हाऊसच्या बांधकामासंदर्भातील सर्व कागदपत्रांची छाननी होऊन, रेकॉर्डवर येणाऱ्या माहितीसह सातारा तहसीलदारांनी अहवाल सादर करेपर्यंत, स्टोनक्रशर आणि फार्महाऊस तातडीने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्याची माहिती पुनवडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुधीर देसाई आणि संकल्प इंजिनिअरिंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, नाहरकत दाखल्यासह बनावट कागदपत्रे जोडून, पुनवडी, ता. सातारा येथील सर्व्हे नं. 46/8 आणि 47/4 येथे स्टोनक्रशर बेकायदेशीररित्या चालवला जात आहे. या क्रशरमुळे प्रचंड प्रदूषण होत आहे. धरणापासून अतिशय जवळ असलेल्या या क्रशरमुळे वन आणि जलसंपत्तीला मोठ्या प्रमाणावर बाधा निर्माण होत आहे. स्टोनक्रशरसाठी पुनवडी ग्रामपंचायतीच्या एनओसीशिवाय लगतच्या दुसऱ्याच ग्रामपंचायतीची एनओसी जोडली आहे.
क्रशरची जागा बिगरशेती आवश्यक असताना, शेतीच्या जागेवर क्रशर चालवला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तेथे सुरुंग लावून दिवसरात्र खाणकाम आणि स्टोनक्रशर सुरू असतो. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून क्रशर बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. त्याचबरोबर सौ. आशा भोसले आणि सौ. पल्लवी भोसले यांनी उरमोडी धरणालगत बेकायदेशीररित्या फार्महाऊस आणि अन्य बांधकाम केले आहे.
या निवासी इमारतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे तेथील सांडपाणी जमिनीत मुरून, धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. फार्महाऊस म्हणजे शेती अवजारे ठेवण्यासाठी केलेले कच्चे बांधकाम, असा अर्थ असताना, येथे अनधिकृतरित्या आलिशान बांधकाम करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार पूरपातळीपासून (वॉटर लेव्हल) 200 मीटरच्या आत कोणतेही बांधकाम करता येत नाही; परंतु या फार्महाऊसचे बांधकाम पूरपातळीपासून सुमारे 100 फुटांवर आहे.
उरमोडी जलाशयाच्या संपादित क्षेत्रामध्ये अतिक्रमण करुन, हे बांधकाम केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून केलेले बांधकाम पाडण्यात यावे, अशी तक्रार संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या चिन्मय कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या संदर्भात काल (दि. 17) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष बैठकीतील इतिवृत्तानुसार, स्टोनक्रशर आणि फार्महाऊस तातडीने सील करण्याचा आदेश जयवंशी यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
क्रशर तातडीने बंद करावा आणि खाणपट्ट्यात झालेल्या उत्खननाची मोजणी करुन तहसीलदारांनी अहवाल सादर करावा. फार्महाऊसला परवानगी, नाहरकत प्रमाणपत्रे कोणी दिली? अशा परवानग्या देण्याचे अधिकार संबंधितांना आहेत का, याविषयी अहवाल तातडीने सादर करावेत. फार्महाऊसच्या जागेसह सरकारी जागेची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक आणि जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.
या बैठकीस पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, महावितरणचे अधीक्षक अभियंता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, सातारचे प्रांताधिकारी, उरमोडीचे कार्यकारी अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी, साताराचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.